
पुणे प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात भाविकांची वाढणारी गर्दी आणि देखावे पाहण्यासाठी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आज, रविवारपासून (३१ ऑगस्ट) शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते दररोज सायंकाळी ५ नंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. हा निर्णय ५ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहतूक बंदीचा परिणाम प्रामुख्याने लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावर होणार आहे. या मार्गांवर केवळ अत्यावश्यक सेवांची वाहने सोडून इतर सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. गर्दी ओसरेपर्यंत हे मार्ग बंद राहतील.
• वाहतुकीस बंद असणारे मुख्य रस्ते
लक्ष्मी रस्ता : हमजेखान चौक ते टिळक चौक
छत्रपती शिवाजी महाराज रस्ता : गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक (स्वारगेट)
बाजीराव रस्ता : पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक
टिळक रस्ता : मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक
• बंद असणारे अंतर्गत रस्ते
सिंहगड गॅरेज, दिनकरराव जवळकर चौक, सणस रस्ता (मंडई परिसर), पानघंटी चौक, गंज पेठ परिसर, गायकसाब मशिद – सेंटर स्ट्रीट चौकी, कोहिनूर चौक – बाबाजान चौक (लष्कर) तसेच अनेक अंतर्गत रस्ते वाहतुकीस बंद राहतील.
• वाहन उभे करण्यास बंदी
शिवाजी रस्ता (जिजामाता चौक ते मंडई), मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या भागात वाहन उभे करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
• एकेरी वाहतुकीत शिथिलता
गणेशोत्सव काळात, गरजेनुसार कुमठेकर रस्ता, फडके हौद रस्ता, सिंहगड गॅरेज ते महापालिका कार्यशाळा (घोरपडे पेठ) तसेच लष्कर भागातील कोहिनूर हॉटेल चौक ते भगवान महावीर चौक (महात्मा गांधी रस्ता) या मार्गांवरील एकेरी वाहतुकीचे आदेश तात्पुरते शिथिल करण्यात येणार आहेत.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले की, “गणेशोत्सव काळात मध्यवर्ती भागात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. नागरिकांनी वाहतूक बदलांना सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला मदत करावी.”