
मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असून, पोलिसांनी या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. शनिवारी सकाळी १० वाजता उपोषण सुरू केलेल्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.
“लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हे प्रत्येकाचं हक्क आहे. शासनाची भूमिका देखील सहकार्याचीच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे. लोकशाहीतून संवादातून प्रश्न सोडवले जातात. आंदोलन हा त्यातील एक मार्ग आहे. त्यामुळे जे सहकार्य अपेक्षित आहे ते शासन करत आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईतील काही भागात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करून वाहतूक विस्कळीत केली होती. मात्र, पोलिसांच्या चर्चेनंतर आंदोलकांनी सहकार्य करत त्या जागा मोकळ्या केल्या. तरीदेखील मोठ्या संख्येने लोक आझाद मैदानात जमल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.
“काही जण वेगळ्या पद्धतीने वागले, तर संपूर्ण आंदोलनाला गालबोट लागू शकते. त्यामुळे कोणीही आडमुठेपणाने किंवा अलोकतांत्रिक पद्धतीने वागू नये,” असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. जरांगे पाटील यांनीदेखील आंदोलकांना शांततेने व नियम पाळून आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.