
मुंबई प्रतिनिधी
मराठा आणि संघर्ष हे समीकरण नवीन नाही. इतिहास साक्ष देतो की, मराठ्यांनी नेहमीच प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत मार्ग काढला आहे. मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनात हाच संघर्ष पुन्हा डोळ्यांसमोर उभा राहिला आहे. मुसळधार पावसामुळे आझाद मैदान चिखलाने माखलं आहे. आसमंतातील दुकानं बंद, शौचालयाची अपुरी व्यवस्था… पण आंदोलक डगमगताना दिसत नाहीत.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा बांधव आज आझाद मैदानात दाखल झाले. जरांगे सकाळपासून उपोषणावर बसले आहेत. त्यांच्यासोबत आलेले बांधव मैदानात थांबले, काहींनी मात्र सीएसएमटी स्थानकात आसरा घेतला.
रस्त्यावरचं जेवण, फुटपाथवरची झोप
आंदोलनाच्या ठिकाणी निवासाची कुठलीही सोय नाही. त्यामुळे आंदोलक बांधवांनी रस्त्यावरच थांबून आपापलं जेवण उरकलं. कुणी हातात चपाती धरून उभं राहून जेवत होता, तर कुणी महापालिकेबाहेर फुटपाथवर बसून जेवण करताना दिसला.
घरुन डबाबंद जेवण आणलेले काही, तर काहींनी मुंबईत मिळेल त्या ठिकाणी चूल पेटवून जेवण बनवलं. हातात चपाती आणि चटणी असलेलं जेवण हे या संघर्षाची आणि साधेपणाची कहाणी सांगतं.
पोलिसांनाही वाटलं जेवण
आंदोलक मराठ्यांचा मोठेपणा पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवला. स्वत:साठी बनवलेलं जेवण त्यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिसांनाही दिलं. आंदोलन शांततापूर्ण ठेवण्याची भूमिका त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवली.
न डगमगणारा संघर्ष
पाऊस, चिखल, अपुरी सोय… या सगळ्यांवर मराठ्यांनी मात केली आहे. रात्रीचे दृश्य खरंच हृदय पिळवटून टाकणारे आहेत. कुणी रस्त्याच्या कडेला आडवं झालंय, कुणी रेल्वे स्थानकात थांबलंय. पण डोळ्यांत फक्त संघर्षाची जिद्द आणि आरक्षणाचा निर्धार दिसतोय.
मराठ्यांचा हा संघर्ष केवळ आंदोलनापुरता मर्यादित नाही, तर त्यांच्या सामूहिक सहनशीलतेची, एकतेची आणि अढळ जिद्दीची जिवंत साक्ष ठरतोय.