
नवी मुंबई प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेला मराठा मोर्चा आज (शुक्रवार, २९ ऑगस्ट) पहाटे मुंबईत दाखल झाला. पहाटे सव्वासहा वाजता आंदोलक वाशी टोलनाक्यावर पोहोचताच ‘लढेंगे जितेंगे’, ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला.
हम सब जरांगेच्या घोषणा देत आंदोलकांनी मुंबईत प्रवेश केला असून, आज सकाळी ९ वाजता आझाद मैदानावर जरांगे उपोषणास सुरुवात करणार आहेत. मुंबई पोलिसांनी २० अटींवर हे आंदोलन फक्त एका दिवसापुरतेच परवानगी दिल्याने पुढे जरांगे काय भूमिका घेणार, कुठे मुक्काम करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२७ ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथून निघालेला हा मोर्चा अहमदनगर, पुणे, शिवनेरी, लोणावळा मार्गे लाखोंच्या संख्येने मुंबईकडे सरकला. मुंबई व नवी मुंबईत गुरुवारपासूनच आंदोलकांची गर्दी उसळली होती. नवी मुंबईतील बाजार समिती, सिडको प्रदर्शन केंद्र, तेरणा विद्यालय अशा ठिकाणी आंदोलकांनी मुक्काम केला.
आज पहाटे वाशी टोलनाक्यावर दाखल होताच आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. टोलनाका ते वाशी प्लाझापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गुरुवारी मध्यरात्री चाकण येथे जरांगेंचे क्रेनद्वारे हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. जुन्नरपासून मोर्चात मोठ्या प्रमाणावर समाजबांधव सहभागी झाले. “आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी नाही,” असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
दरम्यान, आझाद मैदानावर आज सकाळपासून आंदोलकांचा प्रचंड जमाव उसळला आहे. अधिकृत परवानगीनुसार पाच हजार आंदोलकांनाच मैदानात परवानगी देण्यात आली असून, सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेतच आंदोलन करण्याची परवानगी आहे. मात्र प्रत्यक्षात मैदान पूर्णपणे भरले आहे.