
नवी दिल्ली प्रतिनिधी
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपली छाप सोडली आहे. यंदा राज्यातील चार शिक्षकांचा या प्रतिष्ठित सन्मानासाठी निवड झाली असून, शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली छाप उमटवली आहे. हा पुरस्कार येत्या ५ सप्टेंबर २०२५ रोजी शिक्षक दिनानिमित्त भव्य समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण क्षेत्रातील विजेते
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये देशभरातील ४५ शिक्षकांची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा समावेश आहे –
डॉ. शेख मोहम्मद वकुओद्दीन शेख हमीदोद्दीन, जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धपूर, नांदेड
डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे, दयानंद कॉलेज ऑफ आर्ट, लातूर
या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकारांना तसेच अध्यापनात केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांना राष्ट्रीय स्तरावर दाद मिळाली आहे. कठोर आणि पारदर्शी निवड प्रक्रियेत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन स्तरांवरून झालेल्या चाचणीनंतर त्यांची निवड करण्यात आली.
उच्च शिक्षण क्षेत्रातील विजेते
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांतर्गत २१ प्राध्यापकांची निवड देशभरातून झाली असून, त्यात महाराष्ट्रातील दोन प्राध्यापकांनी स्थान मिळवले आहे –
डॉ. नीलाक्षी जैन, शाह अँन्ड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई
प्रा. पुरुषोत्तम पवार, एस. व्ही. पी. एम. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग, बारामती
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, उच्च शिक्षणातील प्रेरक व सक्षम प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०२३ पासून या पुरस्काराची सुरुवात झाली. संशोधन, समाजाभिमुख उपक्रम, नवोन्मेष आणि अध्यापनातील परिणामकारकता या निकषांवर आधारित निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातील या दोन्ही प्राध्यापकांनी बाजी मारली आहे.
शिक्षकांचा गौरव – राज्याचा गौरव
एकूण ६६ शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५ साठी सन्मान होत आहे. त्यात महाराष्ट्रातील चार शिक्षकांची उपस्थिती ही राज्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. शिक्षण क्षेत्रातील या हिरकणींनी केलेल्या अथक परिश्रमांचा हा राष्ट्रीय गौरव आहे.