पालघर प्रतिनिधी
रेल्वे रुळांवरून जात असताना किंवा रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात होणाऱ्या अपघातांच्या घटना राज्यात सातत्याने समोर येत असतानाच पालघरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांच्या भीतीने पळत सुटलेल्या तीन तरुणांना समोरून येणाऱ्या मालगाडीची धडक बसल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर पूर्वेकडील जुना पालघर परिसरातील जैन मंदिराजवळ ही दुर्घटना घडली. स्वप्निल पालांडे, कुणाल दुबळा आणि अफरोज शेख अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे असून तिघेही स्थानिक असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमके काय घडले?
स्थानिक परिसरात पोलिसांची कारवाई सुरू असताना काही तरुणांनी तेथून पळ काढल्याचे सांगितले जाते. याच दरम्यान स्वप्निल, कुणाल आणि अफरोज हे तिघेही पोलिसांच्या भीतीने धावत धावत रेल्वे रुळांच्या दिशेने गेले. मात्र घाईगडबडीत त्यांना समोरून वेगाने येणाऱ्या मालगाडीचा अंदाज आला नाही.
काही क्षणांतच मालगाडीने तिघांनाही जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
नातेवाईकांचे गंभीर आरोप
या घटनेनंतर मृत तरुणांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांच्या भीतीनेच हे तरुण पळत सुटले आणि त्यामुळेच ते रेल्वे रुळांवर गेले, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
परिसरात हळहळ
घटनेची माहिती समोर येताच परिसरात मोठी गर्दी झाली. तरुणांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाचा नेमका तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक माहिती गोळा केली जात असल्याचे सांगण्यात आले.


