
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी केवळ ओळखपत्र नव्हे, तर दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. सरकारी योजना, बँक व्यवहार, शिष्यवृत्ती, करसवलती अशा असंख्य कामकाजात आधार क्रमांकाची गरज भासते. त्यामुळेच विवाहानंतर नाव व पत्ता बदलणे आवश्यक ठरते. या बदलांसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रक्रिया उपलब्ध करून दिल्या आहेत.
नाव बदलण्याची प्रक्रिया
•ऑफलाइन पद्धत
जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्यावी.
तिथे अपडेट फॉर्म भरून आधार क्रमांक, नवीन पूर्ण नाव नमूद करावे.
विवाह प्रमाणपत्र (मॅरेज सर्टिफिकेट) व पतीचे आधार कार्डाची छायांकित प्रत सादर करावी.
शुल्क ५० रुपये आकारले जाते.
अर्ज स्वीकारल्यानंतर URN क्रमांकासह ॲक्नॉलेजमेंट स्लिप दिली जाते.
साधारणतः ९० दिवसांत नाव अपडेट होते.
•ऑनलाइन पद्धत
UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.uidai.gov.in) “Update Demographics Data” पर्याय निवडावा.
आधार क्रमांक, कॅप्चा भरून लॉगिन करावे.
“Name” हा पर्याय निवडून नवीन नाव भरावे.
विवाह प्रमाणपत्र व जोडीदाराच्या आधारची स्कॅन प्रत अपलोड करावी.
५० रुपये शुल्क भरून अर्ज सबमिट करावा.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नवीन नाव आधारमध्ये समाविष्ट होते.
पत्ता बदलण्याची प्रक्रिया
ऑफलाइन पद्धत :
आधार केंद्रावर जाऊन अपडेट फॉर्ममध्ये नवीन पत्ता लिहावा.
पुराव्यासाठी भाडे करार, वीज/पाणी बिल किंवा अन्य वैध कागदपत्र सादर करावे.
विवाह प्रमाणपत्र व पतीच्या आधारची प्रत जोडावी.
URN क्रमांक मिळाल्यानंतर ९० दिवसांत पत्ता अपडेट होतो.
•ऑनलाइन पद्धत
UIDAI संकेतस्थळावर जाऊन “Address” पर्याय निवडावा.
नवीन पत्ता प्रविष्ट करून संबंधित पुरावे (उदा. रेंट ॲग्रीमेंट, वीज बिल) व विवाह प्रमाणपत्राची स्कॅन प्रत अपलोड करावी.
५० रुपये शुल्क भरून अर्ज सादर करावा.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आधारवर नवीन पत्ता नोंदवला जातो.
•महत्त्वाच्या सूचना
सर्व दस्तऐवज स्पष्ट, अद्ययावत आणि वैध असणे गरजेचे आहे.
ऑनलाइन अर्ज करताना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आवश्यक असून, OTP द्वारे सत्यापन केले जाते.
अर्जाचा स्टेटस तपासण्यासाठी URN क्रमांकाचा वापर करावा.
अडचणी आल्यास UIDAI ची हेल्पलाइन १९४७ वर संपर्क साधता येतो.
विवाहानंतर नाव आणि पत्ता बदलणे आता सहज शक्य झाले असून, UIDAI च्या ऑनलाइन व ऑफलाइन प्रणालींमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.