
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतो. मात्र विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारी प्रचंड गर्दी आणि पुलांवर होणारे अतिवजन हे अपघाताचे कारण ठरू शकते, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. धोकादायक ठरलेल्या १२ पुलांवर मिरवणुका थांबवू नयेत, असे स्पष्ट आवाहन पालिकेने केले आहे.
पालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील एकूण १२ पुलांचा या यादीत समावेश असून, या पुलांवर मिरवणूक थांबविल्यास संरचनात्मक धोक्याचा संभव असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. पुलांच्या दुरुस्तीची काही कामे सुरू आहेत, तर उर्वरित कामे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
पालिकेने गणेशभक्तांना आवाहन केले की, श्रीगणेशाच्या मिरवणुकीदरम्यान पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. पोलिस व पालिकेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. या पुलांवर लाऊडस्पीकर लावून नाचगाणी करू नयेत, तर उत्सवाचा आनंद पुल पार करून घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
धोकादायक पुलांची यादी
मध्य रेल्वेवरील पूल:
घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल
करी रोड रेल्वे उड्डाणपूल
चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपूल
भायखळा रेल्वे उड्डाणपूल
पश्चिम रेल्वेवरील पूल:
मरीन लाइन्स रेल्वे उड्डाणपूल
सँडहर्स्ट रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅण्ट रोड व चर्नी रोडदरम्यान)
फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅण्ट रोड व चर्नी रोडदरम्यान)
केनेडी रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅण्ट रोड व चर्नी रोडदरम्यान)
फॉकलंड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅण्ट रोड व मुंबई सेंट्रलदरम्यान)
महालक्ष्मी स्टेशन रेल्वे उड्डाणपूल
प्रभादेवी-कॅरोल रेल्वे उड्डाणपूल
दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे उड्डाणपूल
मुंबईकरांनी उत्सवाचा आनंद घेताना खबरदारीचे भान ठेवावे आणि सुरक्षिततेसाठी पालिका व पोलिस प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वारंवार करण्यात आले आहे.