
नवी मुंबई |प्रतिनिधी
तुर्भे सेक्टर २२ परिसरात अनधिकृत बांधकामे धडाक्यात सुरू असून नागरिकांच्या वारंवार तक्रारींकडे महापालिका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच एका इमारतीचा काही भाग कोसळून चार कामगार जखमी झाल्याच्या घटनेनंतरही प्रशासन जागे होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बांधकामाविरोधात अनेकदा तक्रारी दाखल करण्यात आल्या. तरीसुद्धा बांधकाममालकाने कोणत्याही भीतीशिवाय राजरोस काम सुरू ठेवले. ही इमारती घाईगडबडीत व निकृष्ट दर्जाने उभारली जात असल्याने काही वर्षांतच कोसळण्याचा धोका निर्माण होतो. परिणामी अनेक कुटुंब बेघर होतात, तसेच जीवितहानीचीही शक्यता वाढते.
महापालिकेचा निष्क्रिय कारभार
महापालिका प्रशासन आणि डी विभागीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. तक्रारींनंतरही कारवाई होत नसल्याने प्रशासन आणि बांधकाम माफिया यांच्यातील संगनमत असल्याची कुजबुज नागरिकांत सुरू झाली आहे.
अलीकडील दुर्घटना धडा न ठरणारी
तुर्भेतीलच एका इमारतीचा काही भाग कोसळून चार कामगार जखमी झाले होते. त्यांना वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिकच ऐरणीवर आला असला, तरी प्रशासनाने त्यातून धडा घेतल्याचे दिसत नाही.
जवाबदार कोण?
“अनधिकृत बांधकामे थांबविण्याची जबाबदारी महापालिकेची असताना, अपघात झाल्यावर प्रशासन जबाबदारी झटकते. मग नागरिकांनी नेमके कोणाकडे दाद मागावी?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.