
ठाणे प्रतिनिधी
ठाणे : ठाणे आणि मीरा-भाईंदर या दोन शहरांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या घोडबंदर रोडवर येत्या ८ ऑगस्टपासून ११ ऑगस्टपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या चार दिवसांच्या कालावधीत घोडबंदर रोडवरील एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नीरा केंद्र ते फाऊंटन चौकदरम्यान हे काम राबविण्यात येणार असून मीरा-भाईंदर महानगरपालिका याची मुख्य अंमलबजावणी करणार आहे.
या कामांमुळे वाहतुकीच्या दृष्टीने मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण दुरुस्ती सुरू असताना एकच मार्गिका सुरू राहणार आहे. परिणामी वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रवाशांचा प्रवास २० ते ४० मिनिटांनी वाढू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलीस, मीरा-भाईंदर वाहतूक विभाग आणि वसई-विरार पोलीस यांच्यात समन्वयाने वाहतुकीचं नियोजन करण्यात आलं आहे. विशेषतः अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था केली असून ही वाहतूक पवई मार्गे वळवण्यात येणार आहे.
दैनंदिन प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी दोन्ही बाजूंना रुग्णवाहिका आणि क्रेन तैनात करण्यात आली आहेत, जेणेकरून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत पोहोचवता येईल.
प्रशासनाचं नागरिकांना आवाहन –
या काळात नागरिकांनी सहकार्य करावं, संयम बाळगावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचं पालन करावं. चुकीच्या दिशेने वाहन चालवू नये, कारण त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. दरम्यान, या कामकाजाचा कालावधी आणखी एका दिवसासाठी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या दुरुस्तीमुळे काही काळासाठी गैरसोयीचा सामना करावा लागणार असला, तरी भविष्यातील सुरक्षित आणि दर्जेदार रस्त्याच्या दृष्टीने हे काम आवश्यक असल्याचं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.