
मुंबई प्रतिनिधी
मुंबई : गेल्या दोन दिवसांची उसंत संपवत पावसाने आज पुन्हा एकदा तुफानी बॅटिंगला सुरुवात केली आहे. सकाळपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह उपनगरात वाहतुकीचा खोळंबा झाला असून, लोकलच्या गाड्याही उशिराने धावू लागल्या आहेत.
हवामान खात्याने २५ ऑगस्टसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार घाटकोपर, चेंबूर, सायन, वांद्रे अशा अनेक भागांत मुसळधार सरींनी हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातही पावसाचा जोर वाढल्याने दिवसाढवळ्या अंधारमय वातावरण निर्माण झाले.
रेल्वे सेवेत खोळंबा
मुंबईची ‘लाईफलाईन’ मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेला पावसाचा फटका बसला आहे.
मध्य रेल्वे : कल्याण-सीएसएमटी मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहेत. ठाणे-कल्याण दरम्यान ५ ते १० मिनिटांचा विलंब आहे.
पश्चिम रेल्वे : विरार-चर्चगेट गाड्या ५ ते ७ मिनिटं उशिराने धावत आहेत.
ट्रान्स-हार्बर लाईन : वाशी-सीएसएमटी गाड्यांनाही उशीर होत आहे.
तांत्रिक अडचणींसह पावसामुळे गाड्यांची गती मंदावली आहे.
रस्त्यांवर वाहतूक कोंडी
कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, वांद्रे आणि सायन परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. मात्र पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक सुरळीत असल्याचे चित्र आहे.
प्रवाशांचे हाल
भायखळा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना पावसामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्लॅटफॉर्मवरील स्कायवॉकला गळती लागल्याने ‘धबधबा’ कोसळल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. त्यामुळे छत्री घेऊनच प्रवास करावा लागत असून, तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे.
गणेशोत्सवाची लगबग
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा ओढा वाढला आहे. कुर्ला एसटी डेपोमध्ये कोकणासह पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी उसळली आहे. अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या उत्सवामुळे गावी पोहोचण्यासाठी मोठी लगबग दिसून येत आहे.
मुंबईकरांनी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रवासात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.