
स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई |कोकणातल्या गावी आपल्या बाप्पाच्या दर्शनाला जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी वांद्रे (पूर्व) येथून मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले. वांद्रे येथील (एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे) विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या पुढाकारातून ही सेवा अनेक वर्ष राबवली जात आहे
गणपतीचे दिवस हे कोकणातल्या प्रत्येक घराघरातले उत्साहाचे आणि स्नेहबंध वृद्धिंगत करणारे क्षण मानले जातात. मात्र मुंबईतून गावाकडे जाण्यासाठी वाढलेले तिकीटदर आणि प्रवासातील गैरसोयी यामुळे अनेक कुटुंबांपुढे अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर सरमळकर यांनी मुंबई परिसरातील गणेशभक्तांसाठी विनामूल्य बससेवेची योजना हाती घेतली.
या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात वांद्रे (पूर्व) येथून थेट कोकणातील विविध भागांसाठी बसगाड्या रवाना करण्यात आल्या. प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने वांद्रे पूर्व पटांगणातील परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कुटुंबासमवेत कोकणात जाणाऱ्या अनेकांनी या सोयीबद्दल समाधान व्यक्त केले.
“कोकणातील गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मुंबईत कष्ट करून जगणारे अनेक कोकणी बांधव बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी आपल्या गावी जातात. त्यांना मदत करणे हीच खरी सेवा,” असे कुणाल सरमळकर यांनी सांगितले.
दरम्यान, बससेवेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात आले नाही. केवळ नोंदणी करून प्रवासी आपल्या गावासाठी रवाना होऊ शकतात. पुढील काही दिवसांत या सेवेचा विस्तार करण्याचा विचार असल्याचेही सरमळकर यांनी स्पष्ट केले.