मुंबई, प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मुंबईत मोठा खांदेपालट करत नवे नेतृत्व पुढे आणले आहे. आशिष शेलार यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे काढून अमित साटम यांच्या खांद्यावर ठेवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेलार यांच्या कार्याचा गौरव केला. “मुंबईच्या राजकारणात शेलार यांनी भरीव काम केले आहे. आता साटम यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास आहे,” असे फडणवीस म्हणाले.
नवे अध्यक्ष कोण?
मुंबईच्या पश्चिम उपनगरात दीर्घकाळ नगरसेवक आणि आमदार म्हणून कार्यरत असलेले अमित साटम हे पक्षाचे आक्रमक वाणी आणि संघटित काम यासाठी ओळखले जातात. सलग तीनवेळा अंधेरी पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेल्या साटम यांनी विधानसभेत विविध नागरी प्रश्नांवर ठामपणे भूमिका घेतली आहे. भाजपच्या धोरणांची मांडणी करताना त्यांचा स्वभाव लढाऊ आणि अभ्यासू असा मानला जातो.
शैक्षणिक पार्श्वभूमी
१५ ऑगस्ट १९७६ रोजी मुंबईत जन्मलेले साटम यांनी मिठीबाई कॉलेजातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाशी संलग्न महात्मा गांधी मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चमधून त्यांनी कार्मिक व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी (एमएमएस) प्राप्त केली.
भाजपाची रणनीती
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने हा खांदेपालट केल्याचे स्पष्ट संकेत आहेत. अनेक वर्षे संघटनेच्या पदांवर कार्यरत राहून गटाशी निष्ठा राखणाऱ्या साटम यांच्यावर विश्वास दाखवला आहे. यानिमित्ताने भाजप मुंबईत नव्या पिढीचे नेतृत्व पुढे आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे जाणकारांचे मत आहे.


