
पुणे प्रतिनिधी
गणेशोत्सवात पुणेकरांना दहा दिवस दारू मिळणार नाही. जुन्या पुण्यातील विश्रामबाग, फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणारी सर्व दारूची दुकाने, बीअर बार, परमिट रूम आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याचा आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढला आहे.
याआधी ही बंदी फक्त पहिल्या व शेवटच्या दिवशीच मर्यादित होती; मात्र शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संपूर्ण उत्सवकाळासाठी ‘ड्राय डे’ लागू करण्याची विनंती केली होती. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, लाऊडस्पीकर वापरावर मात्र सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गणेशोत्सवाच्या दरम्यान ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि विसर्जन दिनांक ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी दिली आहे. ही सूट एकूण सात दिवसांसाठी लागू असेल.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परंपरेनुसार लाऊडस्पीकरला ५ दिवसांची परवानगी दिली जाते. यंदा उत्सवाचे चौथे व पाचवे दिवस शनिवार-रविवारवर आल्याने मोठ्या गर्दीचा अंदाज बांधून कालावधी दोन दिवसांनी वाढवण्यात आला.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही पुण्यातील आढावा बैठकीदरम्यान या निर्णयाची घोषणा केली होती.
केंद्र सरकारच्या ध्वनिप्रदूषण नियमांनुसार जिल्हाधिकाऱ्यांना वर्षातून १५ दिवस मध्यरात्रीपर्यंत लाऊडस्पीकर वापरास अनुमती देण्याचा अधिकार आहे. मात्र, रुग्णालय, शाळा व न्यायालयांसारख्या शांतता क्षेत्रांमध्ये ही सूट लागू राहणार नाही