
रायगड प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर पहाटेच्या सुमारास घडलेला थरारक प्रकार… एका खाजगी लक्झरी बसमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र बसचालकाच्या सतर्कतेमुळे तब्बल 44 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.
ही घटना पोलादपूरजवळील कशेडी बोगद्याजवळ पहाटे दोनच्या सुमारास घडली. मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणकडे निघालेली ही बस महामार्गावरून जात असताना, अचानक एका टायरचा स्फोट झाला. काहीतरी बिनसल्याची चाहूल लागल्याने चालकाने तातडीने बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवले.
दरम्यान, टायर फुटल्याने लागलेली आग काही मिनिटांतच बसच्या इतर भागात पसरली. प्रवाशांना खाली उतरवल्यानंतरच बसचे डिझेल टाकीही स्फोटाने उडाली. सुदैवाने तोपर्यंत सर्व प्रवासी सुरक्षित स्थळी पोहोचले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील वाहतूक थांबवून बचावकार्य सुरू करण्यात आले. तब्बल एक तासाच्या प्रयत्नानंतर, पहाटे तीनच्या सुमारास आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या घटनेप्रकरणी पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. मात्र, चालकाच्या जागरुकतेमुळे आणि प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.