
रायगड प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका निर्जन घरातून एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील ताडवाडी गावात घडलेल्या या प्रकाराने संपूर्ण परिसर हादरला आहे. नेरळ पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या धाडसामुळे ही कारवाई उघडकीस आणली असून, पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे.
सोमवार, १० ऑगस्टच्या मध्यरात्री काही ग्रामस्थांना गावाजवळील निर्जन घरात संशयास्पद हालचाली दिसल्या. एका मारुती ब्रेझा कार आणि शेताजवळ उभी असलेली रुग्णवाहिका, तसेच रात्रीच्या अंधारात खोकी वाहून नेणारे तरुण — हा सगळा प्रकार पाहून ग्रामस्थांनी तात्काळ सतर्कता दाखवली. त्यांनी घराला घेराव घालत आत डोकावून पाहिले, तेव्हा पाच तरुण इलेक्ट्रिक हीटरवर विविध रंगांची रसायने उकळत असल्याचे दिसले. उग्र वास आणि चबुतऱ्यावर मांडलेली रसायने पाहून ग्रामस्थांनी लगेच पोलिसांना पाचारण केले.
नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच आरोपींनी काही रसायने जमिनीवर ओतून आणि मोबाईल फोडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल फोन, रसायने, बर्फाच्या लाद्या आणि सिमेंटच्या गोण्या यांसह महत्त्वाचा पुरावा जप्त केला.
प्राथमिक तपासात, अटक झालेल्या तरुणांपैकी एकाने डी-फार्मसीचे शिक्षण घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्याचा या बेकायदेशीर निर्मितीत सक्रिय सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी सापडलेली रसायने फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवली असून, हा एमडी ड्रग्ज तयार करण्याचा अड्डा असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट होत आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरात दोन महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी २२ कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. त्यामुळे कर्जत परिसरातील बेकायदेशीर ड्रग्ज निर्मितीच्या जाळ्याचा पुन्हा पर्दाफाश झाला आहे. सध्या नेरळ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.