रायगड प्रतिनिधी
पैशाच्या वादातून पोटच्या मुलांनीच आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात घडलेल्या या हत्याकांडाने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दोन दिवसांपूर्वी घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
मृत दांपत्याची नावे महादेव कांबळे (70) आणि विठाबाई कांबळे (65) अशी असून, त्यांच्या मृत्यूला सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू अथवा आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने केलेल्या तपासात हे प्रकरण थरारक हत्येचे असल्याचे उघड झाले. फक्त 24 तासांत पोलिसांनी आरोपींना गजाआड केले.
घरखर्चावरून वाद, रागाच्या भरात सुटले हात
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलांना आई-वडील घरखर्च देत नाहीत आणि घरात राहू देत नाहीत, याचा प्रचंड राग होता. संतापाच्या भरात दोघांनी रात्री घरात घुसून आई-वडिलांवर हल्ला चढवला. दोघांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी मृतदेह घरातच टाकून पलायन केले.
दोन दिवसांनी शेजाऱ्यांना कुजलेल्या वासाचा संशय आला. त्यांच्या तक्रारीवरून पोलीस घरात दाखल झाले आणि दुर्दैवी प्रकार समोर आला.
गावकऱ्यांचा संताप; कठोर शिक्षेची मागणी
या प्रकरणात नरेश कांबळे आणि चंद्रकांत कांबळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. गावकऱ्यांनी या जघन्य कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “पालकांचे ऋण फेडण्याऐवजी त्यांच्या जीवावर उठले, अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून परिसरात या घटनेने शोककळा पसरली आहे.


