
मुंबई प्रतिनिधी
वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयातील प्रलंबित मागण्या आणि वैद्यकीय अधीक्षकांकडून होत असलेल्या कथित दुय्यम वागणुकीविरोधात शुक्रवारी कामगारांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. कामगारांचा इशारा असून, मागण्या मान्य न झाल्यास २ ऑक्टोबरपासून संप पुकारण्यात येणार आहे.
कामगारांनी निदर्शनात मांडलेल्या मागण्यांमध्ये रिक्त पदे व पदोन्नती तत्काळ भरून काढणे, सेवाज्येष्ठतेनुसार कामाचे वाटप करणे, महिलांसाठी साडीऐवजी ड्रेस उपलब्ध करून देणे, रुग्णालयातील प्रत्येक मजल्यावर विश्रांतीगृह उपलब्ध करणे, तसेच आवश्यक साहित्याचा पुरेसा व वेळेवर पुरवठा करणे, उपहारगृहातील निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांबाबत चौकशी करणे अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे.
कामगारांच्या संघटनेनुसार, सेवा गणवेशाचे कापड, साबण, टॉवेल आदींचा पुरवठा करण्यात होणारा भेदभाव, गोपनीय अहवालाची प्रतवारी, अतिकालीन कामाचा मोबदला या सारख्या मुद्यांवर अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहेत. याशिवाय, वैद्यकीय अधीक्षकांकडून कामगारांना अवमानकारक भाषा वापरली जात असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला.
निदर्शनानंतर झालेल्या सभेत, ३० सप्टेंबरपर्यंत कोणताही तोडगा न निघाल्यास २ ऑक्टोबरपासून संप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. “संप काळात वैद्यकीय सेवेत अडथळे निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील,” असे स्पष्ट वक्तव्य द म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी केले.