
मुंबई प्रतिनिधी
दोन दिवसांच्या सलग मुसळधार पावसाने मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट केली आहे. प्रमुख महामार्ग, लिंक रोड आणि अंतर्गत रस्त्यांवर उघडलेल्या खड्ड्यांनी शहराचा वाहतूक प्रवास अक्षरशः खड्ड्यात लोटला आहे. बुधवारी सकाळपासूनच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. अर्धा तासाच्या प्रवासासाठी नागरिकांना अडीच ते तीन तास रस्त्यात अडकून बसावे लागले.
पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर सांताक्रूझ, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव-महानंद डेअरी, ओबेरॉय मॉल परिसर, मालाड, कुरार व्हिलेज, बाणडोंगरी, ठाकूर व्हिलेज, मागाठणे आदी भागात रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी डांबर उखडून खडी बाहेर पडली असून वाहनचालकांना खड्ड्यांतून वाट काढत प्रवास करणे भाग पडले. त्यातच महामार्गाशी संलग्न सर्व्हिस रोडची स्थिती अधिकच गंभीर आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरातील सर्व्हिस रोडवर डांबर गायब होऊन चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनचालकांसोबत पादचाऱ्यांनाही हाल सहन करावे लागत आहेत.
पूर्व द्रुतगती महामार्गावरील घाटकोपर, मुलुंड, भांडुप परिसरातही रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. मोठे खड्डे, खचलेला रस्ता यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्याचा ठाणे आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर थेट परिणाम झाला.
दरम्यान, महामार्गांवरील खड्ड्यांमुळे अनेक गाड्या रस्त्यातच बंद पडल्या. वाहनांचे पार्ट्स खिळखिळे होत असून दुरुस्तीचा बोजा वाहनधारकांवर पडत आहे. पावसाने उघड केलेल्या या रस्त्यांच्या निकृष्ट दर्जामुळे सरकार आणि संबंधित ठेकेदारांवर वाहनचालकांनी रोष व्यक्त केला आहे.
महानगरातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीतील भ्रष्टाचाराचे पितळ दोन दिवसांच्या पावसात उघडे पडल्याने, मुंबईकरांना रोजच्या प्रवासात खड्डे आणि वाहतूक कोंडीचा ‘दुहेरी फटका’ बसत आहे.