
नाशिकरोड प्रतिनिधी
मुंबई व उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडवला आहे. रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने हजारो प्रवासी अडचणीत सापडले. अनेक गाड्या रद्द, तर काहींना तासन्तास विलंब झाला. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या तसेच लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
इगतपुरी, कसारा, कल्याण आदी स्थानकांवर गाड्या थांबविण्यात आल्या. मुंबई–धुळे एक्स्प्रेस व वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. अमरावती ते मुंबई एक्स्प्रेस ही नाशिक रोडपर्यंत धावली आणि तेथूनच पुन्हा अमरावतीकडे रवाना करण्यात आली. पंचवटी एक्स्प्रेस सकाळी ठरलेल्या वेळेपेक्षा तब्बल साडेचार तास उशिरा मुंबईत दाखल झाली.
मुंबईहून सुटणाऱ्या अनेक गाड्यांना देखील मोठा विलंब झाला. मुंबई–हिंगोली जनशताब्दी, जबलपूर गरीबरथ, नागपूर सेवाग्राम, निजामुद्दीन राजधानी, हावडा दुरांतो, नांदेड एक्स्प्रेस, गोरखपूर विशेष, जयनगर, प्रतापगड एक्स्प्रेस या गाड्या एक ते तीन तास उशिरा रवाना झाल्या. तर नागपूर सेवाग्राम, विदर्भ सुपरफास्ट, देवगिरी, महानगरी, पुष्पक, तपोवन, हावडा, राज्यराणी, जनशताब्दी, तुलसी, कामायनी, मंगला लक्षद्वीप, कुशीनगर, मुंबई–एलटीटी सी या गाड्या मुंबईत चार तासांपर्यंत उशिरा पोहोचल्या.
रेल्वे सेवा उशिरा व रद्द झाल्याने स्थानकांवर प्रवाशांचा प्रचंड गर्दीचा लोंढा उसळला. आरक्षण रद्द व तिकिटांचे पैसे परत घेण्यासाठी रांगा लागल्या. स्थानक परिसरात अनेक प्रवासी तासन्तास बसून राहिले. दरम्यान, खाद्यपदार्थ व पाण्याच्या बाटल्या यांची विक्री दुप्पट दराने होत असल्याने प्रवाशांचा त्रास अधिकच वाढला.
मुंबईतील अनेक सरकारी व निमसरकारी कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. बेस्ट व एसटी बसना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांकडून जादा दर आकारले जात असल्याचेही समोर आले.
पावसामुळे निर्माण झालेल्या या गोंधळामुळे मुंबई व उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, सामान्य नागरिकां मध्ये संताप व्यक्त केला जात. आहे.