
नाशिक प्रतिनिधी
नाशिकच्या घोटी परिसरात बुधवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दिनेश सावंत (३८) आणि पत्नी भाग्यश्री सावंत (३३) या दाम्पत्याने धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आयुष्य संपवलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधानगर घोटी येथे वास्तव्यास असलेल्या या दाम्पत्याने इगतपुरीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेससमोर उडी मारली. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
दिनेश आणि भाग्यश्री यांचे २०१३ मध्ये लग्न झाले होते. गेल्या ११ वर्षांपासून त्यांनी सुखी संसार केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
घोटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.