
उमेश गायगवळे |पत्रकार
मुंबईतील खार पुर्व परिसरातील भुयारी मार्ग दोन दिवसांपासून अक्षरश तलावात परिवर्तित झाला आहे. कार्डिनल ग्रेसेस स्कूलच्या जवळील हा मार्ग तीन ते चार फूट पाण्याने भरून गेला असून स्थानिक मुलांनी त्याला “पोहोण्याचा तलाव” समजून मजा सुरू केली आहे. पण, यामध्ये कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पश्चिम उपनगरातील खार पूर्वेकडून येण्यासाठीचा हा महत्त्वाचा भुयारी मार्ग दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो. विजयनगर, अहिंसा नगर, शासकीय वसाहत, सिद्धार्थ नगर आणि अनेक वसाहती आहेत. या सर्व वस्त्यांना जोडणारा हा मार्ग असून, याच परिसरात कार्डिनल ग्रेसेस, महात्मा गांधी विद्यामंदिर, न्यू इंग्लिश स्कूल, अशा शाळा आहेत. परिणामी, शेकडो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दररोज या मार्गावरून प्रवास करावा लागतो. परंतु, सध्या पाण्यामुळे मार्ग बंद झाल्याने नागरिकांना पादचारी पूल हा एकमेव पर्याय वापरावा लागत आहे.
दरवर्षी असा अनुभव येऊनही स्थानिक प्रशासनाने या समस्येवर कधीही ठोस उपाययोजना केलेली नाही. नालेसफाईचा डंका वाजवला जातो, कोट्यवधींची कामे दाखवली केली जातात; पण पहिल्याच पावसात भुयारी मार्ग तुंबून जातो आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे खरे दर्शन घडते.
याहून अधिक धक्कादायक म्हणजे या पाण्यात मुले धाडसाने पोहत आहेत. एकीकडे पालक आपल्या लेकरांना शाळेत सुरक्षित नेण्याची धडपड करत असताना दुसरीकडे ही मुले “तलावात” उड्या मारत आहेत. विजेचा धक्का बसणे, चिखलात अडकणे किंवा इतर अपघात होण्याचा धोका टळणार तरी कसा? अशा घटनांची जबाबदारी कोण घेणार?
स्थानिक पालक, ज्येष्ठ नागरिक यांचा प्रश्न रास्त आहे
“शहराला स्मार्ट सिटी म्हणणारे अधिकारी एवढ्या प्राथमिक समस्येकडे का डोळेझाक करत आहेत?”
मुंबई महापालिकेच्या सातत्याने अपयशी ठरत असलेल्या पावसाळी नियोजनामुळे खारकरांच्या रोजच्या जीवनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्त्यांवर दरवर्षी तेच पाणी, तेच डबके आणि तेच प्रश्न… नागरिक मात्र प्रशासनाला दरवेळी जागं करतात, पण प्रशासन मात्र नागरिकांची थट्टा करत असल्याचा सूर स्थानिकांतून उमटतो आहे.
खारच्या भुयारी मार्गाचा हा “तलाव” नागरिकांसाठी धोक्याचा इशारा आहे. पण प्रशासनाला हादरवण्यासाठी आणखी एखादी दुर्घटना घडणे गरजेचे आहे का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.