
मुंबई प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता अक्षरशः हाहाकार माजवत आहे. देशभरात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांत अतिवृष्टी सुरू आहे.
महाराष्ट्रातही पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड आणि कोकणासाठी रेड अलर्ट जारी केला असून, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील इतर भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाचा स्पष्ट इशारा आहे – नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.
मुंबईत तुंबई
मुंबईत रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून पहाटेपर्यंत 400 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. परिणामी, नेहमीप्रमाणेच मुंबई ‘तुंबई’ झाली. दादर वेस्ट परिसरात झाड कोसळून रस्त्यालगत उभ्या असलेल्या गाडीचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे रस्ता मोकळा करण्यात आला.
अंधेरी सबवे रात्री पाण्याखाली गेला होता. पहाटे पालिका कर्मचाऱ्यांनी पाणी उपसून वाहतूक सुरळीत केली. तर किंग्ज सर्कल, ईस्टर्न हायवे, सायन परिसरात रस्ते जलमय झाले. अनेक ठिकाणी वाहनं पाण्यात बंद पडली. विरारसह उपनगरातील विविध भागांत भूमिगत गटार चेंबर ओव्हरफ्लो झाले.
रेल्वे वाहतुकीवर संभाव्य परिणाम
लोकल रेल्वे मात्र पहाटेपर्यंत सुरळीत होती. चर्चगेट-व्हिरार मार्गावरील वाहतूक अव्याहत सुरू होती. तरीही दादर स्टेशनच्या पाचव्या प्लॅटफॉर्मवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भीषण भूस्खलन
विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात जनकल्याण सोसायटीत भूस्खलन होऊन मोठा अपघात घडला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
शेतकऱ्यांना दिलासा
गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भागातही आज पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
एकूणच, मुंबई आणि कोकणात पुढील 24 तास अतिजोखमीचे ठरणार आहेत. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, प्रशासन सतर्कतेचा इशारा दिला आहे.