
मुंबई प्रतिनिधी
मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे पुन्हा एकदा एका भव्यदिव्य आणि रोमहर्षक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची घोषणा केली असून, साताऱ्याच्या ग्रामीण भागात घडलेल्या रक्तरंजित सत्यकथेचा हा सिनेमाई आविष्कार असणार आहे.
सातारा जिल्ह्यातील डोंगररांगांच्या सान्निध्यात वसलेल्या तांबवे गावातील विष्णू बाळा पाटील यांच्या थरारक जीवनकथेवर हा चित्रपट आधारलेला आहे. गावच्या भाऊबंदकीतून आणि श्रेयवादातून पेटलेला सख्ख्या चुलत भावांमधील वाद, त्यातून कुटुंबावर ओढवलेला अन्याय आणि त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी विष्णूबाळाने दिलेला जीवावरचा संघर्ष – ही सगळी कहाणी प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.
या भव्य प्रकल्पाचं लेखन अरविंद जगताप यांनी केलं असून, दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे सांभाळत आहेत. निर्मितीची जबाबदारी मनोहर जगताप यांची आहे. ‘विश्वविनायक सिनेमॅटिक सफारी फिल्म एलएलपी प्रोडक्शन’ या बॅनरखाली निर्मित होणारा हा चित्रपट मराठीसोबतच हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
“काहीतरी वेगळं आणि प्रभावी सादर करण्याची इच्छा होती. सयाजी शिंदे यांच्या ताकदीच्या उपस्थितीत ही सत्यकथा प्रेक्षकांसमोर भव्यदिव्य पद्धतीने मांडण्याचा निर्णय घेतला,” असं दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी सांगितलं. तर सयाजी शिंदे यांनी या कथेबद्दल बोलताना, “साताऱ्याच्या ग्रामीण मातीत घडलेली ही घटना जनसामान्यांना अचंबित करणारी ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला.
विशेष म्हणजे, 2001 मध्ये ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ या नावाने आधीच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात सयाजी शिंदे यांच्यासह अनेक मातब्बर कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. आता दोन दशकांनंतर पुन्हा एकदा नव्या कलाकारांचा संच, नव्या तंत्रज्ञानाची साथ आणि भव्य मांडणी यामुळे ‘तांबव्याचा विष्णूबाळा’ नव्या रूपात प्रेक्षकांसमोर सादर होणार आहे.
सिनेसृष्टीत सूडनाट्य, कुटुंबीयांचा संघर्ष आणि मानमरातबाच्या लढाया यांचे उत्तम मिश्रण असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल, यात शंका नाही.