
नागपूर प्रतिनिधी
राज्यातील राजकारणाला हादरा देणारा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी “२८८ पैकी १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी” देणारे दोन व्यक्ती त्यांना दिल्लीमध्ये भेटायला आल्याचं पवारांनी उघड केलं. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले –
“मला आठवतंय, विधानसभा निवडणुकीच्या आधी दोन लोकं मला दिल्लीमध्ये भेटायला आले. त्यांची नावं-पत्ते माझ्याकडे आता नाहीत. त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी आम्ही देऊ. मला हे ऐकून आश्चर्य वाटलं. निवडणूक आयोगाबद्दल मला तेव्हा कोणतीही शंका नव्हती, त्यामुळे मी दुर्लक्ष केलं. नंतर त्या लोकांनी माझी आणि राहुल गांधी यांची भेट घडवून आणली. त्यांचं म्हणणं राहुल गांधी यांच्या समोरही सांगितलं. मात्र आम्ही दोघांनी ठरवलं की, हा आपला मार्ग नाही. लोकांचा जो निर्णय असेल तो स्वीकारू.”
या दाव्याला एनसीपीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दुजोरा दिला.
“मला माहिती आहे, दोन व्यक्ती पवार साहेबांकडे गेले होते. त्यांनी मतदार याद्या ‘मॅन्युपुलेट’ करून अमुक जागा जिंकून देऊ असं सांगितलं होतं. १६० हा आकडा त्यांनीच दिला होता. पवार साहेबांना यावर विश्वास बसला नाही. त्यांनी विषय पुढे नेलाच नाही. पण हे स्पष्ट आहे की, मतदार याद्यांमध्ये धांदली करण्यासाठी यंत्रणा कार्यरत होती आणि ती पवारांपर्यंत पोहोचली होती,” असा थेट आरोप आव्हाडांनी केला.
या स्फोटक वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा भडका उडाला असून, ‘ते दोघे’ कोण? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात गाजत आहे.