
नागपूर प्रतिनिधी
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी देणारी नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस आजपासून धावू लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवत या सुपरफास्ट सेवेला सुरुवात केली.
नागपूर रेल्वे स्थानकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक क्षण पार पडला. फडणवीस यांनी सांगितले की, “ज्या प्रवासाला आतापर्यंत 16-17 तास लागत होते, तो आता अवघ्या 12 तासांत पूर्ण होईल. पुणे-नागपूर कनेक्टिव्हिटीसाठी ही क्रांतीच आहे.”
बसप्रवास महाग, ट्रेन ठरली दिलासादायक
या मार्गावर खासगी बसचे तिकीट ५ हजारांच्या वर जात असल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भार सोसावा लागत होता. फडणवीस म्हणाले, “या त्रासातून सुटका मिळावी, म्हणून वंदे भारतची मागणी केली. रेल्वे मंत्र्यांनी लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला.”
देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत
881 किमी अंतराचा हा देशातील सर्वांत लांब पल्ल्याचा वंदे भारत मार्ग ठरला आहे. याआधी इतक्या मोठ्या अंतरासाठी वंदे भारत सेवा सुरू झालेली नव्हती.
नगरमार्गे थेट पुण्याकडे प्रस्ताव
सध्या ही गाडी नगरवरून दौंडमार्गे पुण्याकडे जाते, ज्यामुळे 100 ते 125 किमी प्रवास वाढतो. फडणवीस यांनी सुचविले की, नगरवरून थेट पुण्याकडे मार्गिका केल्यास वेळ वाचेल आणि अंतर कमी होईल. रेल्वे अधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक चर्चा सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
वेग, सुविधा आणि वेळेची बचत – नागपूर-पुणे वंदे भारत प्रवाशांसाठी आता प्रवासाचा नवा अनुभव ठरणार आहे.