
नागपूर | प्रतिनिधी
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा नागपूरमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आला. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फुके, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्त शीतल तेली-उगले, विविध लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्न जिल्हा संघटनांचे पदाधिकारी व बुद्धिबळप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नागरी सत्कारामुळे तरुण बुद्धिबळपटूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून दिव्या देशमुखने आपल्या यशातून महाराष्ट्राचा आणि देशाचा लौकिक वाढविला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.