
मुंबई-प्रतिनिधी
मुंबई : मराठी माणसांविषयी गरळ ओकणारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा (MTDC) मुजोर अधिकारी अखिलेश शुक्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कल्याणमधील योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईटस् या इमारतीमध्ये राहणाऱ्या अखिलेश शुक्ला यांनी त्यांचे शेजारी असणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना गुंडांकरवी मारहाण केली होती. देशमुख कुटुंबातील दोन भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात अखिलेश शुक्ला यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असला तरी त्यांना अटक करण्यात दिरंगाई झाल्याने अखिलेश शुक्ला हे फरार झाले होते. त्यामुळे राज्यभरात नाराजीचे सूर उमटत होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात महत्त्वाची घोषणा केली. त्यानुसार माजोरड्या अखिलेश शुक्ला यांना तात्काळा प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने मराठी माणसाला अपमानित होईल असा उल्लेख केला आणि त्यातून संतापाची लाट लोकांमध्ये निर्माण झाली आहे. एमटीडीसी मधे काम करणारा शुक्ला हा व्यक्ती आहे. त्याच्या पत्नीवर देखील गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर निलंबनाची कारवाई सुरू झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली.
अखिलेश शुक्लांचे स्पष्टीकरण काय ?
अजमेरा इमारतीत झालेल्या वादावर अखिलेश शुक्ला यांनी बाजू मांडत याप्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिले आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे. आपल्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला आणि नंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी त्यांना वाचवले,असे त्यांनी सांगितलं.
“आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, मी स्वतःला मराठी भाषिक समजतो. या वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत, पण त्या वादादरम्यान देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला. माझ्या बायकोला शिवीगाळ केली, तिचे केस पडकून तिला मारहाण करण्यात आली ” असा आरोपही शुक्ला यांनी पुढे केला . खरंतर हा शेजारीपणाचा जुना वाद असून त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत शुक्ला यांनी त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.