
मुंबई प्रतिनिधी
रक्षाबंधनाचा धागा हा फक्त बहीण-भावाच्या नात्यापुरता मर्यादित नसतो… तो प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, आणि माणुसकीचा शाश्वत धागा असतो. पण यंदा गुजरातच्या वलसाडमध्ये बांधली गेलेली एक राखी मात्र या सगळ्या अर्थांपलीकडे गेली. ती पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणणारी, मनाचा ठाव घेणारी आणि धर्म, जात, रक्तसंबंध सगळ्या भिंती मोडून टाकणारी होती.
शिवम मिस्त्री… ज्या तरुणानं गेल्या वर्षी आपल्या लाडक्या बहिणीचा हात कायमचा गमावला होता. पण नियतीनं या नात्याचा धागा तुटू दिला नाही. कारण बहिण रियाच्या मृत्यूनंतर तिचे हात अजूनही जिवंत आहेत — दुसऱ्या एका जीवाला नवसंजीवनी देत. आणि याच हातांनी… हो, अगदी याच हातांनी… रक्षाबंधनाच्या दिवशी शिवमच्या मनगटावर राखी बांधली.
मुंबईच्या गोरेगावमधील १६ वर्षांची अनमता अहमद — धर्मानं मुस्लिम, पण मनानं फक्त बहीण. तिच्या दोन्ही हातांपैकी उजवा हात काही वर्षांपूर्वी गंभीर अपघातात पूर्ण गेला, डावा हात फक्त थोड्याशा क्षमतेनं कार्यरत राहिला. दुसरीकडे, केवळ नऊ वर्षांची रिया सप्टेंबर २०२४ मध्ये अचानक आजारी पडून गेली. मेंदूतील रक्तस्रावानं तिचा मृत्यू झाला.
त्या दु:खद क्षणी रियाच्या कुटुंबानं घेतलेला धाडसी निर्णय — अवयवदान. ‘डोनेट लाइफ’ या सूरतस्थित एनजीओच्या माध्यमातून रियाचे हात खांद्यापासून अनमताला प्रत्यार्पण करण्यात आले. रिया जगातील सर्वात लहान वयाची हात प्रत्यार्पण करणारी दाता ठरली. तिचं यकृत, मूत्रपिंडही इतरांना नवं जीवन देऊन गेले.
आणि आज… एक वर्षानं… अनमताचे ते हात शिवमच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी आले. मिस्त्री कुटुंबाच्या घरात भावनांचा पूर ओसंडून वाहू लागला. “त्या हातांचा स्पर्श झाला, आणि क्षणभर वाटलं रिया पुन्हा आमच्यासोबत आहे,” शिवमचे वडील बॉबी मिस्त्री अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले.
ही फक्त राखी नव्हती… ती होती माणुसकीनं विणलेली गाठ, धर्म-जात-रक्तसंबंधाच्या साऱ्या भिंती ओलांडून प्रेम आणि आपुलकीनं बांधलेली. आणि अशी गाठ… कधीच तुटत नाही.