
ठाणे प्रतिनिधी
नवी मुंबई : अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नी व सासूवर विकृत प्रकार केले असल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईमध्ये उघडकीस आली आहे. रमेश (राहिवासी देवरिया, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव असून, त्याने काळ्या जादूच्या नावाखाली पत्नी व सासूला निर्वस्त्र करून अश्लील छायाचित्रे काढत त्यांचा छळ केला.
रमेश हा पत्नी राधा व सासू सरिता यांच्यासह नवी मुंबईत भाड्याच्या घरात राहत होता. रमेशचा स्वभाव आधीपासून संशयास्पद होता. एप्रिल महिन्यात त्याने आपल्या पत्नीला व सासूला सांगितले की, राधाच्या भावाचे (आपल्या मेव्हण्याचे) लग्न जमवायचे असल्यास एक “विशेष टोटका” करावा लागेल. त्यासाठी दोघींनी कपडे काढावेत, असे विकृत आदेश त्याने दिले.
काळ्या जादूच्या भीतीपोटी व आपल्या मुलाचे लग्न व्हावे, या आशेने दोघी महिला या कृतीला तयार झाल्या. मात्र रमेशने या घटनेचा वेगळाच हेतू साधत त्यांचा नग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ काढले. त्यानंतर त्याने पत्नीला धमकावत सांगितले की, तिच्या इच्छा न मानल्यास हे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करेल.
रमेश एवढ्यावरच थांबला नाही. त्याने आपल्या पत्नीला अजमेरला बोलावून घेतले व त्यानंतरही तिचे फोटो तिच्या वडिलांना व भावाला पाठवले. अखेर हा मानसिक व सामाजिक छळ सहन न झाल्याने राधाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. मात्र गुन्हा नोंदवण्यात येताच रमेश फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेमुळे माणूस कशापर्यंत जाऊ शकतो, याचे हे भयावह उदाहरण ठरले आहे.