
औरंगाबाद प्रतिनिधी
“माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर तुझे फोटो तुझ्या घरी पाठवेन, तुला बदनाम करेन,” अशा धमकीच्या छळाला कंटाळून बी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या रुमवर गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीवर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत विद्यार्थिनीचं नाव कल्याणी वायाळ (रा. परिजात कॉलनी, सेलू, जि. परभणी) असं आहे. आरोपीचं नाव सुरज उर्फ शुभम मोरे (रा. देवगाव खवणे, ता. मंठा, जि. जालना) असून, तो कल्याणीला चार-पाच वर्षांपासून ओळखत होता.
धमकी, छळ आणि शेवटचा निर्णय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी ही ग्रीव्हज कॉलनी, एन-7 येथील एका रुमवर मैत्रिणीसोबत राहत होती. सुरज मोरे हा सतत लग्नासाठी दबाव टाकत होता. “तू लग्न केलं नाही तर आपले काही फोटो घरच्यांना दाखवून बदनाम करीन,” अशा धमक्या तो वारंवार देत होता. या मानसिक छळामुळे त्रस्त झालेली कल्याणी ३० जुलै रोजी दुपारी गळफास घेताना आढळली.
या घटनेची माहिती प्रथम कल्याणीच्या मैत्रिणीने तिची मोठी बहीण प्रतिक्षा वायाळ हिला दिली. प्रतिक्षा लगेच संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी बहिणीच्या आत्महत्येची माहिती दिली.
१५ दिवसांपूर्वी सांगितला होता त्रास
घटनेच्या पंधरा दिवस आधी कल्याणी सावरगाव येथे आली असताना प्रतिक्षाला तिच्या व्यथेबाबत सांगितलं होतं. “सुरज नेहमी फोन करून लग्नाचा आग्रह धरतो. बोलली नाही तर फोटो घरच्यांना पाठवून बदनाम करेल, अशी धमकी देतो,” असं तिने सांगितलं होतं.
गुन्हा दाखल, तपास सुरू
प्रतिक्षा वायाळ हिने दिलेल्या तक्रारीनुसार सिडको पोलिस ठाण्यात आरोपी सुरज मोरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल नेनेकर करीत आहेत.