
नागपूर प्रतिनिधी
विदर्भात पावसाने आज पुन्हा एकदा तडाखा दिला असून, गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नदी-नाल्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गोंदियातील 27 मार्ग ठप्प, पूरस्थिती भीषण
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतो आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
देवरी तालुक्यात 10, मोरगाव अर्जुनीत 7, आमगावमध्ये 4 आणि गोरेगाव-तिरोडा तालुक्यांतील 6 मार्ग बंद आहेत.
गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भंडाऱ्यातही स्थिती चिंताजनक, आठ मार्ग बंद
भंडारा जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहे.
वैनगंगा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने कारधा गावाकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.
साकोली आणि लाखनी तालुक्यांतील विर्शी-उकारा, चिंगी-खोबा, सराटी-चीचगाव, मिरेगाव-सोनमाळा यांसारखे आठ मार्ग बंद आहेत.
मेळघाटात मुसळधार पाऊस, धारणीतील मुख्य मार्ग ठप्प
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात मुसळधार पावसाचा प्रकोप सुरू आहे. धारणी तालुक्यात उतावलीजवळ चाकरडा पाटीयाकडे जाणारा मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून बंद आहे.
हवामान विभागाने या भागासाठी 24 तासांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
गडचिरोलीत पूरपरिस्थिती सुधारली, मात्र 3 मार्ग अद्याप बंद
गडचिरोली जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी परिस्थिती अजूनही गंभीर आहे.
सिरोंचा-जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग, अहेरी-वटरा व कढोली-उराडी हे तीन मार्ग अद्याप वाहतुकीसाठी बंद आहेत.
भामरागडजवळील पर्लकोटा नदीचा पूर ओसरला असला, तरी काल या परिसरातील 100 गावांचा संपर्क तुटला होता.
गोंदियातील सहयोग रुग्णालयात पाणी शिरले
गोंदिया शहरात पावसामुळे जलभरावाची स्थिती निर्माण झाली असून सहयोग रुग्णालय परिसरात पुराचे पाणी शिरले आहे.
रुग्णालयासमोरील पार्किंग यार्डमध्ये दीड ते दोन फूट पाणी साचले असून, ते पंपच्या साहाय्याने काढण्याचे काम सुरू आहे.
या प्रकारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सतर्कतेचा इशारा, प्रशासन सज्ज
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना सतत अपडेट राहण्याचे आवाहन केले असून, नदीकाठच्या वस्तीतील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला दिला आहे.
स्थानिक प्रशासन, आपत्ती निवारण यंत्रणा आणि पोलिस यंत्रणा सज्ज असून, मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक सक्रिय ठेवण्यात आले आहेत.