
मुंबई प्रतिनिधी
मुंबई पोलिस दलातील एन्काऊन्टर स्पेशालिस्ट म्हणून नावाजलेले आणि अनेक गुन्हेगारांच्या काळजाचा ठोका चुकवणारे दया नायक आज (गुरुवार) सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले. नुकतीच त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून बढती मिळाली होती आणि त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांनी पोलिस सेवेला अलविदा केलं.
मुंबईतल्या अंडरवर्ल्डचे वर्चस्व मोडून काढताना दया नायक यांनी मोठी भूमिका बजावली होती. तब्बल 86 एन्काऊंटर त्यांच्या खात्यावर नोंदले गेले आहेत. यामध्ये दाऊद इब्राहिम टोळीतील 22 तर छोटा राजन टोळीतील 20 गुंडांचा समावेश आहे.
‘सिंघम’ची सफर : वेटरपासून एन्काऊन्टर स्पेशालिस्टपर्यंत
कर्नाटकातील एका खेड्यातून सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कामाच्या शोधात मुंबईत आलेले दया नायक, सुरुवातीला हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करीत होते. गोरेगावमधील शाळेत शिक्षण घेत असताना त्यांचा संपर्क अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस अधिकाऱ्यांशी आला. तेव्हाच त्यांनी पोलिस अधिकारी बनायचं ठरवलं.
त्यांच्या कारकिर्दीतील पहिला एन्काऊंटर 1996 मध्ये झाला, जेव्हा छोटा राजनच्या दोन गुंडांचा त्यांनी सामना केला. त्यानंतर त्यांचं नाव एन्काऊन्टर स्पेशालिस्ट म्हणून दुमदुमू लागलं.
गोळी न झाडता 21 वर्षांची कारकीर्द
विशेष म्हणजे, गेल्या 21 वर्षांपासून दया नायक यांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून एकही गोळी सुटलेली नाही. त्यांनी शेवटचं शस्त्र 2004 साली हाताळलं होतं. तरीसुद्धा त्यांच्या नावाने गुन्हेगार थरथरत होते.
वाद, निलंबन आणि पुनरागमन
दया नायक यांच्या सेवेत वादांचाही काळ आला. बेहिशोबी मालमत्तेचा आरोप होऊन त्यांना निलंबनाचा सामना करावा लागला. मात्र चौकशीनंतर ते पुन्हा सेवेत रुजू झाले आणि पोलिस दलात आपली छाप कायम ठेवली.
सन्मानपूर्वक निरोप
त्यांच्या निवृत्तीच्या वेळी अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून त्यांनी दया नायक यांना सन्मानपूर्वक निरोप दिला. एन्काऊन्टर स्पेशालिस्टचं ‘वादळ’ आता शांत झालं असलं, तरी मुंबई पोलिसांच्या इतिहासात दया नायक हे नाव कायमस्वरूपी कोरलं जाईल.