
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या लेकीने पुन्हा एकदा देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे. भारताची उदयोन्मुख बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषक जिंकत बुद्धिबळविश्वात नवा इतिहास रचला आहे. जॉर्जियातील बटुमी येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने भारताच्याच दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पी हिला टायब्रेकर डावात पराभूत करत हे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.
महाराष्ट्राच्या लेकीची दिव्य कामगिरी!
भारतीय बुद्धिबळपटू आणि आपल्या महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख हिने जॉर्जिया येथील बटूमी शहरात पार पडलेल्या ‘FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक‘ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करत अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हंपीला पराभूत करत विश्वविजेत्या पदावर आपलं नावं… pic.twitter.com/ioKl3cQ9WL
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) July 28, 2025
केवळ १९ वर्षांच्या वयात दिव्याने केलेला हा पराक्रम संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे. या विजयामुळे भारताला पहिल्यांदाच महिला बुद्धिबळ विश्वविजेतेपद मिळाले आहे. विशेष म्हणजे, या अंतिम लढतीत दोन भारतीय खेळाडू आमनेसामने होत्या, यामुळे ही स्पर्धा अधिकच संस्मरणीय ठरली.
अटीतटीच्या लढतीत टायब्रेकरमध्ये निर्णायक विजय
अंतिम फेरीतील दोन क्लासिकल डाव अनिर्णीत राहिल्यानंतर सोमवारी टायब्रेकरमध्ये रंगलेली लढत अत्यंत रोमहर्षक ठरली. रॅपिड फॉरमॅटमध्ये दिव्याने हम्पीवर १.५-०.५ ने मात करत जागतिक विजेतेपद आपल्या नावे केले. विजय मिळताच दिव्या भावुक झाली आणि आपल्या आईला मिठी मारून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा केला.
ग्रँडमास्टर किताबाची मिळवलेली शान
या विजयानंतर दिव्याला ग्रँडमास्टर हा प्रतिष्ठेचा किताबही प्राप्त झाला. ती भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे. तिच्या आधी कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली आणि वैशाली रमेशबाबू यांनी हा किताब मिळवला होता. दिव्याच्या या दुहेरी यशाने भारतीय बुद्धिबळात एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
माजी विश्वविजेत्या झोंगीला उपांत्य फेरीत पराभूत करत मिळवले अंतिम फेरीचे तिकीट
दिव्याचा विश्वविजयाचा मार्ग सोपा नव्हता. उपांत्य फेरीत तिने चीनच्या माजी विश्वविजेती टॅन झोंगी हिला पराभूत करत अंतिम फेरी गाठली. संपूर्ण स्पर्धेत तिचा संयमी, अचूक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ सर्वांचं लक्ष वेधून गेला. तिच्या खेळीने अनेक नवोदित बुद्धिबळपटूंना प्रेरणा मिळाली आहे.
देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव
दिव्याच्या ऐतिहासिक विजयानंतर देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गजांनी दिव्याचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताच्या बुद्धिबळ इतिहासात ‘दिव्या’ अक्षरांनी लिहिला गेलेला हा विजय आता अनेक वर्षे प्रेरणादायी ठरणार आहे, यात शंका नाही!