
सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे एका पतीने पत्नीची नृशंस हत्या केल्याची थरारक घटना समोर आली आहे. ‘कधीही शेतात न येणाऱ्या’ पत्नीला शेतात पाहून संतप्त झालेल्या पतीने फरशी डोक्यात घालून तिचा जागीच खून केला. या खळबळजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कौटुंबिक वाद विकोपाला… आणि घटला खून!
मृत महिलेचं नाव गौराबाई नीलकंठ पाटील (वय 60, रा. पाटील गल्ली, हत्तूर) असून, आरोपी पतीचे नाव नीलकंठ भीमराव पाटील (वय 69, रा. पाटील वस्ती, हत्तूर) असे आहे. काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. बुधवारी सकाळी नीलकंठ पाटील आपल्या शेतात काम करत असताना गौराबाई तिथे आल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.
‘तू कधीच शेतात येत नाहीस, आज कशी आलीस?’
पत्नी अचानक शेतात आल्याने नीलकंठ भडकले. त्यांनी गौराबाई यांना प्रश्न विचारला की, “तू कधीच शेतात येत नाहीस, आज कशी आलीस?” यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचा कडेलोट होऊन नीलकंठ यांनी शेतात पडलेली फरशी उचलून थेट गौराबाई यांच्या डोक्यात घातली. जबर मार लागल्यामुळे गौराबाई जागीच कोसळल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर गावात एकच खळबळ
घटनेची माहिती मिळताच विजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपी नीलकंठ पाटील याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
दोन मुलं, एक बेंगळुरूला तर दुसरा गावात
गौराबाई आणि नीलकंठ यांना दोन विवाहित मुले आहेत. यातील एक मुलगा बेंगळुरूमध्ये नोकरीला असून दुसरा गावात राहत आहे. काही काळापासून गौराबाई त्या मुलाकडे राहत होत्या, आणि त्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवरच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
विजापूर पोलीस तपासात व्यस्त
या प्रकरणी विजापूर पोलीस ठाण्यात हत्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. हत्तूर गावात ही घटना चर्चेचा विषय ठरली असून, ‘आपल्या रागावर ताबा न ठेवणं किती महागात पडू शकतं’ याचा हा भयावह प्रत्यय असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.