
सोलापूर प्रतिनिधी
राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिस्त आणि गुणवत्ता राखण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून (१५ जुलै) राज्यातील सर्व विद्यापीठांशी संलग्न उच्च महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांसाठीही बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या आदेशानुसार ही अंमलबजावणी होत असून, विद्यार्थ्यांना आता वर्गात प्रवेश करतानाच बायोमेट्रिक मशीनवर हजेरी लावावी लागणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात ही व्यवस्था तातडीने राबविण्यात येणार आहे.
खास बाबी:
विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक
७५% उपस्थितीशिवाय परीक्षा नाही
प्राध्यापकांनाही नियमांची सक्त अंमलबजावणी
वर्गातच असणार बायोमेट्रिक मशीन
कोचिंगमुळे गळती, नव्या निर्णयाची पार्श्वभूमी
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी नियमित महाविद्यालयात येत नाहीत, कोचिंग क्लासेसकडेच त्यांचा ओढा आहे. परिणामी, विद्यापीठ पातळीवर ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ प्रभावीपणे राबवताना अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर आता शिस्तबद्धतेसाठी बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेसाठी हजेरी अनिवार्य
विद्यार्थ्यांनी दर सत्रात किमान ७५ टक्के उपस्थिती राखणे अनिवार्य करण्यात आले आहे. एका सत्रात ९० दिवसांचे शिक्षण असते आणि त्यात किमान ७० दिवस उपस्थित राहणं आवश्यक ठरणार आहे. परीक्षेचा अर्ज भरताना ही उपस्थिती तपासली जाणार आहे. त्याअंतर्गत हजेरी कमी असणाऱ्यांना माफक आणि ठोस कारणासह विद्यापीठाची परवानगी घ्यावी लागेल.
विद्यापीठांची तयारी व यंत्रणा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न ११५ महाविद्यालयांमध्ये या नव्या प्रणालीची अंमलबजावणी केली जात आहे. सुमारे ५५ हजार विद्यार्थ्यांना हा नियम लागू असणार आहे.
“राज्यपालांच्या आदेशानंतर आम्ही संबंधित सर्व महाविद्यालयांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. यंत्रणा अंमलात आली आहे. आम्ही संवैधानिक अधिकारी महाविद्यालयांना भेटी देऊन या यंत्रणेची पाहणी करू. अडचणी असल्यास त्या मार्गी लावल्या जातील.”
— डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ
सुसज्ज पायाभूत सुविधा अन् शिस्तीचा ध्यास
विद्यार्थ्यांच्या नियमित उपस्थितीमुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाला आहे. शैक्षणिक धोरणांचा परिणाम जमीन पातळीवर दिसावा, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
* आता बायोमेट्रिक यंत्रावर ‘टच’ न करता, कॉलेजात प्रवेश अशक्य!
* शिक्षणात नियमितता अन् गुणवत्ता यांचे नवे पर्व सुरू!