
सोलापूर प्रतिनिधी
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘ई-पिंक रिक्षा’ योजनेतून महिलांना आता स्वतःकडून एक रुपयाही न भरता रिक्षा मिळणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्टपर्यंत आहे.
या योजनेचा उद्देश महिला प्रवाशांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच महिलांसाठी स्वयंरोजगाराची दारे खुली करणे हा आहे. ई-पिंक रिक्षा ही पूर्णतः इलेक्ट्रिक असून पर्यावरणपूरक आहे. यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळण्याबरोबरच प्रदूषणावरही नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे.
या योजनेत रिक्षाच्या एकूण तीन लाख ७३ हजार रुपयांच्या किमतीपैकी २० टक्के रक्कम सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते, तर ७० टक्के बँकेकडून कर्ज दिले जाते. याआधी महिलांना उर्वरित १० टक्के रक्कम स्वतःकडून भरावी लागत होती. मात्र, महिलांचा या योजनेत अपेक्षेप्रमाणे सहभाग न वाढल्यामुळे आता ही रक्कमदेखील शासनाने माफ केली आहे.
महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी सांगितले की, “सोलापूर जिल्ह्यात ६९० महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र काही महिलांचा सिबिल स्कोअर खराब असल्यामुळे त्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत. तसेच अनेक महिलांनी अर्ज केले तरी प्रशिक्षणासाठी पुढे येण्यास अनास्था दाखवली. त्यामुळे शासनाने महिलांना दिलासा देत १० टक्के हिस्सा माफ केला आहे.”
या योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांनी आरटीओकडून परवाना घेऊन मोफत प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक आहे. प्रशिक्षणानंतर त्यांचे अर्ज सिबिल स्कोअरच्या आधारे बँकांकडे कर्जासाठी पाठवले जातील.
सोलापूर जिल्ह्यातील महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
* योजना कशी आहे फायदेशीर?
* कोणताही स्वतःचा आर्थिक सहभाग नाही
* कर्ज + अनुदान स्वरूपात पूर्ण रिक्षा किंमत भरली जाते
* महिला प्रवाशांसाठी सुरक्षित सेवा
* इलेक्ट्रिक रिक्षा — प्रदूषणमुक्त पर्याय
* मोफत प्रशिक्षण आणि आरटीओ परवाना
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ ऑगस्ट २०२५
महिला लाभार्थींनी संबंधित कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून अर्ज सादर करावेत.