
मुंबई, प्रतिनिधी
“येरे येरे पैसा” या मराठी चित्रपटाचे शो वांद्रे पश्चिम येथील ग्लोबल सिनेमा (PVR) मध्ये उपलब्ध असूनही त्यात कपात करण्यात आल्याचा निषेध म्हणून शिंदेंच्या शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडले. मराठी चित्रपटांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी थिएटर व्यवस्थापकांना लिखित निवेदन सादर केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग आणि मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार व विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
“मराठी चित्रपटांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मराठी संस्कृतीवर अन्याय असून, हे खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा यावेळी देण्यात आला. शो पुन्हा वाढवले नाहीत, तर महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते. “जय महाराष्ट्र!” च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.