
मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या पोलीस सेवेत योगदान दिल्यानंतर निवृत्त झालेल्या पोलिसांचा अंत्यसंस्कार आता अधिक सन्मानपूर्वक आणि शासकीय इतमामात होणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने या संबंधी नवा निर्णय घेतला असून, राज्यातील सर्व पोलीस विभागांना या संदर्भात स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही योजना सुरू करताना म्हटलंय, की “पोलीस सेवा ही केवळ नोकरी नसून ती समाजासाठी केलेली एक समर्पित जबाबदारी आहे. सेवा संपल्यानंतरही अशा कर्मचाऱ्यांना समाजाने आणि यंत्रणेनं विसरू नये.”
नवीन निर्णयानुसार, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती, बिगुल वाजवून दिली जाणारी शोक सलामी आणि गरजेनुसार ‘गार्ड ऑफ ऑनर’ यांचा समावेश असेल.
काय असणार नव्या सन्मान पद्धतीचे स्वरूप?
पोलीस गणवेशात अधिकारी उपस्थिती : संबंधित दर्जानुसार, अधिकाऱ्याच्या अंत्यसंस्काराला त्याहून वरच्या दर्जाचा अधिकारी पोलीस गणवेशात उपस्थित राहणार.
गार्ड ऑफ ऑनर आणि शोक सलामी : उच्चपदस्थ निवृत्त अधिकाऱ्यांना अंत्यसंस्कारावेळी सशस्त्र गार्ड ऑफ ऑनर आणि बिगुल शोक सलामी दिली जाईल.
कुटुंबाला शोकसंदेश : अंत्यसंस्कारावेळी उपस्थित अधिकारी संबंधित कुटुंबीयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा शोकसंदेश देणार.
प्रोटोकॉल ठरवला : कोणत्या दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अंत्यसंस्काराला कोण हजर राहील, याचा स्पष्ट प्रोटोकॉल ठरवण्यात आला आहे.
सेवा असूनही अपकीर्ती नको!
सन्मानाचे हे अंत्यसंस्कार आत्महत्या, गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेल्या किंवा गंभीर आरोप असलेल्या निवृत्त पोलिसांना दिले जाणार नाहीत, हेही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
स्थानीक समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक
संपूर्ण प्रक्रियेत विलंब होऊ नये म्हणून प्रत्येक विभागात स्थानिक समन्वय अधिकारी नेमले जाणार आहेत. तसेच निवृत्त पोलिसांची माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारीही संबंधित विभागांवर टाकण्यात आली आहे.
या निर्णयामुळे अनेक निवृत्त पोलिसांच्या योगदानाला राज्य शासनाकडून मिळणारा सन्मान अधिक दृढ होणार असून, अखेरच्या प्रवासातही त्यांना समाजासमोर मानाचा मुजरा मिळणार आहे.