
मुंबई प्रतिनिधी
मुंबई | भारत नगरचा पुनर्विकास केवळ ‘म्हाडा ३३(५)’ योजनेअंतर्गतच व्हावा, अशी मागणी वांद्रेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी म्हाडा मुख्यालयात अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या संदर्भात सरदेसाई यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल आणि मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांची भेट घेतली. भारत नगर हे म्हाडाच्या गॅझेट ले-आऊटमधील क्षेत्र असून, सध्या येथे तीन वेगवेगळे प्रकल्प सुरु आहेत. त्यापैकी एक प्रकल्प ‘म्हाडा ३३(५)’ योजनेअंतर्गत आहे, तर उर्वरित दोन प्रकल्प ‘SRA ३३(१०)’ योजनेअंतर्गत राबवले जात आहेत.
मात्र, SRA अंतर्गत होणाऱ्या पुनर्विकासाला स्थानिक नागरिकांचा विरोध असून, काही रहिवासी न्यायालयातही गेले आहेत. परिणामी उर्वरित भारत नगरचा विकास रखडला आहे. त्यामुळे संपूर्ण क्षेत्राचा विकास ‘म्हाडा ३३(५)’ योजनेद्वारेच करावा, अशी जोरदार मागणी आमदार सरदेसाई यांनी केली आहे.
स्थानिकांच्या हितासाठी आणि सुस्पष्ट पुनर्विकास प्रक्रियेसाठी म्हाडाच्या योजनेतूनच पुढील कामकाज होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.