स्वप्नील गाडे| प्रतिनिधी
मुंबई, दि. २४ – ग्रामीण भागात सर्प आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी झटणाऱ्या सर्पमित्रांच्या सुरक्षेसाठी आणि मान्यतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला जात असून, त्यांना लवकरच अधिकृत ओळखपत्रासह १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे. याचबरोबर, सर्पमित्रांना ‘फ्रंटलाइन वर्कर’चा दर्जा देण्याची शिफारस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत.
मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत महसूलमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भातील कार्यपद्धती (SOP) तयार करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, राज्य वन्यजीव संरक्षक एम. श्रीनिवास राव, तसेच अखिल भारतीय सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा. संभाजीराव पाटील उपस्थित होते.
“सर्पमित्र ग्रामस्थांना सर्पांपासून होणाऱ्या धोका व त्रासातून वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून कार्य करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत, अपघात विम्यासह अधिकृत मान्यता देण्यासाठी ही योजना आखण्यात येत आहे,” असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
सर्पमित्रांना ‘अत्यावश्यक सेवा’ अंतर्गत समाविष्ट करून आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रक्रियेतही त्यांचा समावेश केला जाईल. त्यामुळे त्यांना शासनाकडून आवश्यक ती मदत व सन्मान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सर्पमित्रांसाठी स्वतंत्र पोर्टल
वनविभागाच्या संकेतस्थळावर सर्पमित्रांची अधिकृत माहिती असलेले पोर्टल तयार करण्यात येणार असून, या माध्यमातून स्थानिक नागरिकांना आवश्यक वेळी सर्पमित्रांचा संपर्क सहज साधता येईल. तसेच त्यांच्या कामात पारदर्शकता येईल आणि वन्यजीव संरक्षणात त्यांचा सहभाग अधिक प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी व्यक्त केली.
या निर्णयामुळे सर्पमित्रांच्या कार्याला सन्मान मिळणार असून, त्यांच्या सुरक्षेला शासनमान्यता प्राप्त पाठबळ मिळेल, अशी प्रतिक्रिया सर्पमित्र संघटनांकडून व्यक्त होत आहे.


