
नवी दिल्ली वृत्तसंस्था
“मराठी माणसाला आपटून मारू!” अशी धमकी देणाऱ्या भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी चोख प्रत्युत्तर देत संसद भवनाच्या लॉबीतच घेराव घातला. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि दुबेंना शेवटी तिथून काढता पाय घ्यावा लागला.
दिल्लीत बुधवारी सकाळी लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी थेट दुबे यांना लॉबीत गाठून त्यांच्या वादग्रस्त विधानांबाबत जाब विचारला. ‘मराठी माणूस आमच्या पैशावर जगतो’, ‘पटक-पटक के मारेंगे’ अशा संतापजनक आणि असभ्य भाषेत बोलणाऱ्या दुबेंना या खासदारांनी अर्ध्या शब्दांत सुनावलं.
दुबेंच्या विधानानं पेटला महाराष्ट्र!
महाराष्ट्रात त्रिभाषासूत्रीच्या नावाखाली हिंदी लादण्याच्या निर्णयावरून आधीच वातावरण तापलेलं असताना, दुबेंनी केलेल्या विधानांनी आगीत तेल ओतलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर फडणवीस सरकारनं त्रिभाषासूत्रीचा निर्णय मागे घेतला. पण त्यानंतर दुबेंनी केलेल्या टीकेने मराठी जनतेच्या भावना चांगल्याच भडकल्या.
महिला खासदारांचा कडक पवित्रा
“मराठी माणसाला मारण्याची धमकी तुम्ही देता? कोणाला आणि कशावरून? आमच्या राज्याला तुम्ही खलनायक समजता काय? आमचा स्वाभिमान आम्ही खपवून घेणार नाही!” — अशा रोखठोक शब्दांत वर्षा गायकवाड यांनी दुबेंना सुनावले.
यावेळी ‘जय महाराष्ट्र’च्या जोरदार घोषणा देत तिन्ही महिला खासदारांनी मराठी अस्मितेचा झंझावात संसद लॉबीत उठवला. या जोरदार रोषामुळे गोंधळलेले दुबे काही क्षणांसाठी स्तब्ध झाले आणि नंतर न बोलता लॉबीमधून निघून गेले.
मराठी अस्मिता पुन्हा ऐक्याच्या रेषेत
दुबेंच्या विधानांमुळे महाराष्ट्रातील सर्वच पक्षांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हिंदी सक्तीविरोधी लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठी भाषकांचा स्वाभिमान आणि अस्तित्व जपण्यासाठी देशपातळीवर पुन्हा एकदा एकत्र येण्याची वेळ आली असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.