
आंबेडकरी चळवळीचे झुंजार नेते ,लोकनेते विजयजी वाकोडे यांचे ह्रदय विकाराने नुकतेच निधन झाले आहे. भिमसैनिक शहिद सोमनाथ सुर्यवंशी याचे अंत्यविधी वरुन परततना त्याचे निधन झाले. कालच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात या विषयावर प्रशासनाला धारेवर धरले होते त्याची व्हीडिओ क्लीप सर्वत्र व्हायरल होत होती. नामांतर आंदोलनाचे नेते अशी त्यांची ओळख कायम आहे.
गेल्या चार दशकांपासून आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणून विजय वाकोडे संपूर्ण मराठवाडाच नव्हे तर मराठवाड्याबाहेरही परिचित होते. पँथरच्या चळवळीतून धारदार असे नेतृत्व म्हणून ते पुढे आले. त्याकाळी सामाजिक विषमतेच्या सर्व आंदोलनांमध्ये ते सहभागी होते. दलित पँथरनंतर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक लढ्याचे कार्य चालू ठेवले. लोकनेते या नावाने ते सार्वजनिक जीवनात परिचित होते तर प्रेमाने ‘बाबा’ हे संबोधन त्यांना मिळाले होते. आज सोमवारी परभणीतील पार पडलेल्या निदर्शने व आंदोलनात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीतील एक शिलेदार हरपला आहे.