
कल्याण प्रतिनिधी
कल्याण – शहरातील नेवाळी भागात एका मराठी तरुणीवर परप्रांतीय युवकाने केलेल्या बेदम मारहाणीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी ४-५ पथके कार्यरत होती. मात्र पोलिसांना आरोपी सापडला नसतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मनसेची धडक भूमिका
मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी सांगितले की, “नेवाळी नाका भागातून जात असताना आम्हाला एक संशयित तरुण दिसला. त्याने आम्हाला पाहताच पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला खात्री पटली की तोच आरोपी आहे. आम्ही ४-५ जणांनी त्याला पकडून आमच्या वाहनात बसवले आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो.”
गव्हाणे यांनी सांगितले की, आरोपीसोबत झटापट झाली, मात्र अखेर त्याला ताब्यात घेतले. “त्याला आता पोलिसांच्या स्वाधीन केले असून, पुढील कायदेशीर कारवाई पोलीस करतील,” असे त्यांनी म्हटले.
पोलिसांचा तपास आणि आरोपींचा गुन्हेगारी इतिहास
मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा भाऊ रणजित झा यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन भावांवर गुन्हे दाखल आहेत. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणातील इतर दोन महिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले की, आरोपीवर याआधी उल्हासनगर व कोळसेवाडी येथेही दोन गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात तो तुरुंगात होता आणि जामिनावर बाहेर आल्यानंतरच ही घटना घडवली आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित तरुणीने सांगितले की, “मी बाल चिकित्सालय क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. हा इसम एका रुग्णासोबत आला होता. मी त्याला थोडावेळ थांबण्यास सांगितले, इतक्यावर तो शिवीगाळ करू लागला. मी सरांना सांगितले की तो व्यवस्थित बोलत नाही आहे. त्यानंतर त्याने माझ्यावर हल्ला केला, माझे केस पकडून दरवाजापर्यंत ओढले. मला एवढं मारलं की माझा श्वास काही क्षणांसाठी थांबला होता.”
ही घटना समोर आल्यानंतर नेवाळी परिसरात तणावाचे वातावरण असून मनसेने तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे.