
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला आहे! राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत ऐतिहासिक युतीची घोषणा केली आहे. ही युती म्हणजे केवळ राजकीय समीकरण नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा ठरणार आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आता एकत्र येऊन आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहेत. ‘शिवशक्ती-भीमशक्ती’ या नावाने ओळखली जाणारी ही युती महाराष्ट्रातील दलित-वंचित समाजासाठी नवा आशावाद घेऊन आली आहे.
“ही युती आजची नाही – इतिहासाची पुनरावृत्ती”: आनंदराज आंबेडकर
युतीच्या घोषणेनंतर बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, “ही युती आजची नाही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली ही सामाजिक क्रांती आज राजकीय रूपात पुढे जात आहे. एकनाथ शिंदे हे केवळ मुख्यमंत्री नव्हते, तर खऱ्या अर्थाने कार्यकर्ता होते. त्यांनी तळागाळातल्या जनतेशी एकरुप होऊन काम केलं आहे.”
दलित समाजाला थेट सत्तेत सहभागी करण्याचा निर्धार
“इतके वर्ष आंबेडकरी कार्यकर्ता रस्त्यावर लढत राहिला, पण सत्तेपासून दूर राहिला. आता तोच कार्यकर्ता थेट सत्तेत सहभागी व्हावा, म्हणून आम्ही दोघं एकत्र आलो आहोत,” असंही आनंदराज आंबेडकर यांनी ठामपणे सांगितलं.
महायुतीसाठी नवी ऊर्जा?
राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये यामुळे मोठा बदल घडेल, असा राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे. भाजप, शिंदे गट आणि आता रिपब्लिकन सेनेचा एकत्रित प्रभाव युतीला नव्या उंचीवर नेऊ शकतो. विशेषतः मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूरसारख्या महानगरांमध्ये या युतीचा निर्णायक प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘शिवशक्ती’ आणि ‘भीमशक्ती’ एकत्र येत असल्याने महाराष्ट्रात केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक चळवळींना देखील बळ मिळणार आहे. आता या युतीचा किती फायदा प्रत्यक्ष निवडणुकीत होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.