
मुंबई प्रतिनिधी
राज्यात बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने आता कमर कसली असून लवकरच नव्या कायद्याची घोषणा होणार आहे. मात्र या पार्श्वभूमीवर होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणी रद्द करण्याचा सरकारचा निर्णय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यामुळे संतप्त झालेल्या सीसीएमपी पात्र होमिओपॅथी डॉक्टरांनी १६ जुलैपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने १५ जुलै २०२५ पासून होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (एमएमसी) नोंदणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) जोरदार विरोध करताच नोंदणी प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात आली. यामुळे राज्यातील तब्बल एक लाखांहून अधिक होमिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय झाल्याचा आरोप होत आहे.
सीसीएमपी अभ्यासक्रम (Certificate Course in Modern Pharmacology) हे आधुनिक वैद्यकशास्त्राचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांना एमएमसीमध्ये नोंदणी देण्याचा निर्णय २०१४ मध्येच झाला होता. विधानमंडळाच्या मंजुरीनंतर १ जुलै २०१४ पासून कायदा लागू करण्यात आला होता. यानुसार एमबीबीएस कॉलेजमध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर होमिओपॅथी डॉक्टरांना काही मर्यादित ॲलोपॅथी उपचार करण्यास मुभा देण्यात आली होती.
मात्र, आयएमएने न्यायालयात धाव घेतल्यानंतर मागील १० वर्षांपासून नोंदणी प्रक्रिया थांबली होती. सरकारने ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेताच आयएमएचा दबाव वाढला आणि सरकारने नोंदणी मागे घेतली.
या निर्णयाविरोधात होमिओपॅथी इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन (हिम्पा) ने जोरदार नाराजी व्यक्त केली आहे. “सरकारच्या या निर्णयामुळे सीसीएमपी पात्र डॉक्टरांची बदनामी होत असून, सरकार दिशाभूल करत आहे,” असा आरोप हिम्पाचे पदाधिकारी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने हस्तक्षेपाची मागणी करत, आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनात राज्यभरातून हजारो डॉक्टर सहभागी होणार असल्याची माहिती होमिओपॅथी परिषदेचे माजी सदस्य डॉ. बाहुबली शहा यांनी दिली.
दरम्यान, राज्य सरकारने बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कायदा तयार करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली असून, लवकरच त्याबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना ॲलोपॅथीची संधी नाकारल्यास ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुख्य मुद्दे
२०१४ पासून सीसीएमपी अभ्यासक्रम मान्यता प्राप्त
१५ जुलैपासून नोंदणीस सुरुवात होणार होती
आयएमएच्या विरोधामुळे सरकारने मागे घेतली प्रक्रिया
१६ जुलैपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण
बोगस डॉक्टरांविरोधात नवीन कायदा लवकरच
राज्य सरकार आणि आयएमए यांच्यातील टोकाचे मतभेद आता ताणले गेले असून, याचे पडसाद वैद्यकीय क्षेत्रात चांगलेच उमटण्याची शक्यता आहे.