
मुंबई प्रतिनिधी
२६३३ दिवसांचं नेतृत्व संपलं… नव्या अध्यायाची सुरुवात शशिकांत शिंदे यांच्या नावाने
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) या पक्षाच्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. तब्बल सात वर्षे प्रदेशाध्यक्षपद सांभाळल्यानंतर जयंत पाटील यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. नवा अध्याय सुरू करत शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली.
मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत या घडामोडी घडल्या. यावेळी जयंत पाटील यांची भावनिक प्रतिक्रिया उपस्थितांचे लक्ष वेधून गेली. “मी २,६३३ दिवस प्रदेशाध्यक्ष होतो. ७ वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही. हे मी बायकोलाही सांगितलं,” असे सांगताना ते गहिवरले.
“मतदार विसरतात, पण इतिहास विसरत नाही”
पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेताना जयंत पाटील म्हणाले, “शेतकरी बैल न मिळाल्याने स्वतः नांगराला जुंपून शेती करत आहे. सातबारा कोरा करू अशा आश्वासनांचा पाऊस पाडला गेला, पण आजही शेतकरी संघर्ष करत आहे.”
विधानसभा निवडणुकीत अपयश स्वीकारताना त्यांनी मतदारांच्या मनोवृत्तीवरही भाष्य केलं. “राजेश टोपेंचं कोरोना काळातील काम कुणी विसरणार नाही, पण मतदार विसरतात, हे पाहून खंत वाटते,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
परिसंवाद यात्रेची आठवण, निष्ठेची किनार
पक्षाच्या मजबुतीसाठी काढलेल्या परिसंवाद यात्रेची आठवण काढताना पाटील म्हणाले, “७ हजार ६०० किलोमीटर प्रवास केला. जिथे निवडणूक नव्हती, तिथेही पोहोचलो.”
“माझे अनेक सहकारी इतरत्र गेले, पण मी शेवटपर्यंत साहेबांप्रती निष्ठावान राहिलो. शरद पवारांचं नाव घेतलं की महाराष्ट्रात कुठल्याही गावात ५० कार्यकर्ते सहज मिळतात,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
“भाजप दोन खासदारांवर मोठा होतो, आपण का नाही?”
कार्यकर्त्यांना प्रेरणा देताना जयंत पाटील म्हणाले, “दोन खासदार असलेला भाजप मोठा होतो, तर १० आमदार असलेला आपला पक्ष का नाही?”
ही हक्काची लढाई असून, संघटनेवर विश्वास ठेवून पुढील वाटचालीला सिद्ध राहा, असा संदेशही त्यांनी दिला.
राजकारणातील ‘एक पाटील पर्व’ संपलं, आता शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात नव्या वाटचालीला सुरूवात होणार आहे. जयंत पाटील यांच्या समर्पणाचं प्रतिबिंब त्यांच्या ७ वर्षांच्या अखंड कार्यकाळातून दिसून आलं.