
रायगड प्रतिनिधी
कोकणात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली नसून, यावेळी तो अक्षरशः कहर बनून कोसळला. मागील दोन दिवसांपासून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, पोलादपूर, पाली, रोहा व तळा या तालुक्यांतील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, काही ठिकाणी नद्यांनी घरात घुसखोरी केली आहे. पावसाच्या संततधारामुळे गावागावांत पाणी शिरल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.
सर्वात भीषण दृश्य पाहायला मिळाले ते नागोठण्याजवळ. आधीच काम चालू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर पावसाच्या पाण्याने एवढा जोर धरला की रस्ता जलमय झाला. महामार्गावरून लाटा उसळत असल्याचे भयावह चित्र समोर आले. या ठिकाणी रस्ता म्हणजे एखादी उफाळलेली नदीच वाटत होती.
परिणामी अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातील शाळांना तातडीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून, प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील ४८ तास कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.