
रायगड प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. फिरायला नेतो म्हणत मित्रांनीच एका युवकाचा निर्घृण खून केला. सोनू उर्फ हनीफ शेख (वय अंदाजे ३०) याची हत्या करून त्याचा मृतदेह लोणावळ्याच्या जंगलात फेकण्यात आला. या प्रकरणात खालापूर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून एक अल्पवयीन मुलगाही आरोपी आहे.
सोनू शेख १७ जून रोजी अचानक बेपत्ता झाला होता. पत्नीच्या तक्रारीनंतर खालापूर पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीत त्याच्या मित्रांवर संशय घेण्यात आला. एका संशयित मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम यादव, आशिष चव्हाण, अमर मोरे आणि एक अल्पवयीन मुलगा यांनी सोनूला “फिरायला जाऊ या” असं सांगून कारमध्ये बसवले. त्याला थेट लोणावळ्याजवळील एका फार्महाऊसवर नेण्यात आले. तेथे त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, पैसे नसल्याचे सांगितल्यावर संतापलेल्या आरोपींनी त्याला मारहाण सुरू केली. संध्याकाळ होईपर्यंत तो घरी परतला नसल्याने पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसतशी धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी कबुली दिली की, पोलिसांच्या भीतीने त्यांनी सोनूच्या हातपाय बांधून त्याच्या डोक्यात हत्याराने वार केला आणि नंतर गळा दाबून त्याचा खून केला. मृतदेह जंगलात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सदर प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात कलम 302, 201, 364 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनूचा मृतदेह लोणावळ्याजवळील जंगलातून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.