
मुंबई प्रतिनिधी
कोकणातील घराघरांमध्ये बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यासाठी मुंबई, ठाणे, पालघरहून जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५ हजार जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गणपती, चाकरमानी आणि एसटी – एक हृदयस्पर्शी नातं
एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “गणपती उत्सव म्हणजे कोकणातील चाकरमान्यांचा जिव्हाळ्याचा सण आहे. कोकणचा चाकरमानी, गणपती बाप्पा आणि एसटी यांचे एक अतूट नाते आहे. म्हणूनच नफा-तोटा न पाहता महामंडळ दरवर्षी जादा बसेस उपलब्ध करून देत असते.”
गेल्या वर्षी गणेशोत्सवासाठी ४३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा हा आकडा वाढवून ५००० बसगाड्यांपर्यंत नेण्यात येणार आहे.
आरक्षणाची सुविधा सुरू – येथे मिळणार तिकीट
एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट आरक्षणाची सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने दिली आहे. प्रवासी https://npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर किंवा एसटीचा अधिकृत मोबाईल अॅप वापरून आरक्षण करू शकतात. तसेच जवळच्या बसस्थानकावर प्रत्यक्ष जाऊनही आरक्षण करता येईल.
२२ जुलैपासून गट आरक्षण, महिला-ज्येष्ठांसाठी खास सवलती
या विशेष बससेवेत गट आरक्षणाची सुविधा २२ जुलैपासून सुरू होत आहे. यामध्ये महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ५०% सवलत, तर ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिकांना १००% तिकीट सवलत दिली जाणार आहे.
गणरायाचं आगमन २७ ऑगस्टला – एसटी सज्ज
गणेशचतुर्थी यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी असून त्याच्या स्वागतासाठी मुंबई व उपनगरांमधून कोकणात निघणाऱ्या हजारो चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटीने युद्धपातळीवर नियोजन सुरू केले आहे.
भाविकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून गणपतीच्या भेटीची ओढ आता अधिकच तीव्र झाली आहे.
गणरायाच्या दर्शनासाठी प्रवास करा – तोही सवलतीत आणि सुखकर एसटीसोबत!